कोल्हापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)शहरातील रस्त्याच्या दुरवस्थावरून आ. राजेश क्षीरसागर यांनी, 'रस्त्यांसाठी आम्ही जीव तोडून निधी आणायचा पण महानगरपालीकेतील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बदनामीला आम्ही सामोरे जायचे हे चालणार नाही' असे म्हणत कोणाचाही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांची सुधारणा झालेली दिसली पाहिजे. अन्यथा लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करु, असा इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठक घेऊन दिला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहराची बदनामी होत आहे. लोकप्रतिनिधीना याची विचारणा होत आहे. रस्त्यांसाठी आम्ही जीव तोडून निधी आणायचा पण महानगरपालीकेतील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बदनामीला आम्ही सामोरे जायचे. बैठका घेवून सूचना करूनही कामात सुधारणा होताना दिसत नाही. पुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही, असा दम आ. राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता फुलारी, रस्ते विकास कन्सल्टंट सुरज गुरव, जिल्हा वाहतूक समिती सदस्य रेवणकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar