कोल्हापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाडा विभागांमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे. हजारो नागरिकांना छावण्यांमध्ये ठेवले आहे. या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभा आहे, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५१ लाख रुपयांच्या मदतीतून अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू २५ पैकी १२ ट्रक मधून पाठवण्यात आल्या. लवकरच उर्वरित १३ ट्रकही पाठविले जाणार आहेत. पुढच्या टप्प्यात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पूरग्रस्तांसाठी अंथरूण- पांघरूण, संसारोपयोगी भांडीकुंडी व कपडेही पाठविली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू बाजार समितीच्या आवारातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम झाला. अवघ्या दोनच दिवसापूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पक्षाची तातडीची बैठक घेऊन अतिवृष्टीग्रस्त भागासाठी ५१ लाख रुपयांचे जीवनावश्यक साहित्य पाठविणार असल्याची घोषणा केली होती. एकूण दहा टीमच्या माध्यमातून त्यांनी हा मेळ घातला. अतिवृष्टीग्रस्त झालेल्या २५ हजारांवर नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचविली जाणार आहे. बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला द्यावयाच्या किटमध्ये तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, तसेच; प्रत्येकी एक किलो गोडेतेल, गुळ, साखर, तूरडाळ, पोहे यासह अर्धा किलो चटणी, मीठ, पाच बिस्कीट पुडे असे साहित्य आहे.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या- ज्या वेळी असा महापुर आला, त्या- त्या वेळी या सगळ्या लोकांनी आम्हाला सावरलेलं आहे. आम्ही संकटात असताना हे सगळे जिल्हे भावासारखे धावून आले आहेत. आज ते संकटात आहेत. अशा परिस्थितीत मानवतेच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना मदतीचा दिलासा देऊया. प्रशासनाने आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे आणि पूरग्रस्तांपर्यंत हे साहित्य पोहोचवावे, अशी आमची अपेक्षा आहे. संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदतीच्या रूपाने दिलासा देणारच आहे. तसेच; सगळ्याच दानशूर व्यक्ती, उद्योगपती, नागरिकांनी, संघटनांनी संस्थानी पूरग्रस्तांसाठी धावून यावी, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेले नागरिक आज निवारा शेडमध्ये आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच ज्यावेळी घरामध्ये परतून येतील त्यावेळी त्यांना अंथरूण- पांघरूण, संसारोपयोगी भांडीकुंडी, कपडे हे साहित्य पुरवावे लागेल. असे अत्यावश्यक साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पाठवू.
मुक्या जनावरांचा आशीर्वाद...
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सगळीकडेच महापूर असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांमधून चारा पाठवणे गरजेचे आहे. माणसांबरोबरच मुक्या जनावरांचे आशीर्वादही फार महत्त्वाचे आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चाराही उपलब्ध करून पाठवेल. कोल्हापूर जिल्ह्यासह जवळच असलेल्या सांगली जिल्ह्यामधूनही वैरण उपलब्ध करू. तसेच; गोकुळ दूध संघाची आजच बैठक घेऊन पशुखाद्य आणि टी. एम. आर. भुकटी पाठवण्याच्या सूचना देणार आहोत. टी एम. आर. मध्ये ५० टक्के चाऱ्याची कुट्टी व ५० टक्के पशुखाद्य असे पावडर म्हणजेच भुकटीच्या रूपात हे पशुखाद्य असते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, माजी अध्यक्ष भरत पाटील- भुयेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक किसन चौगुले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar