लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)
लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. गेल्या दोन ते अडीच महिण्यापासून पाऊस सुरू असल्यामुळे हाताला आलेली पिके गेली असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्यावी. अशा मागणीचे निवेदन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेले आहे.
गतवर्षीच्या प्रमाणात यंदा जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरा सर्वाधिक झालेला आहे. त्यामुळे पिकेही चांगली आली होती. परंतु पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे तर जिल्ह्यातील काही भागात ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतीपिकांसह जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच काही गावांमधील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनही अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. या अतिरिक्त झालेल्या पावसामुळे हाताला आलेली पिके गेलेली आहेत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट मदत करावी. अशी मागणी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis