रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज म्हसळा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध लोकपयोगी विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले, तसेच पक्षबळ वाढवण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही घडवून आणला.
खासदार तटकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी १०.३० वाजता सुरई बौद्धवाडी येथे झाली. याठिकाणी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केला. तालुक्यात पक्षसंघटना बळकट करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यानंतर सकाळी ११.३० वाजता म्हसळा शहरातील होळीचे पटांगण सुशोभीकरण करण्यासाठी २० लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना सण-उत्सव आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी अधिक चांगली सुविधा मिळणार आहे.
दुपारी १ वाजता पानवे येथे तालुका कुणबी समाजाच्या पश्चिम विभागाच्या मध्यवर्ती सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे लोकार्पण सोहळा पार पडला. हा उपक्रम स्थानिक समाजासाठी एकत्रित येण्याचे हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष समीर बनकर यांनी सांगितले की, खासदार तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात विकासाची गती वाढत असून, स्थानिक हिताच्या कामांना चालना मिळते आहे.
मागील आठवड्यात मंत्री आदिती तटकरे यांनी देखील तालुक्यातील १२ गावांमध्ये २० विकासकामांचे भूमिपूजन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला वेग येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके