रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
म्हसळा शहरातील बेलदार वाडी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रतिष्ठापित आदिशक्ती दुर्गा मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आज भेट दिली.
मातेच्या प्रतिमेची विधिवत पूजा आणि प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर, मंत्री तटकरे यांचे मंडळातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि स्थानिक तरुणांनी सामाजिक व सांस्कृतिक उत्सव मोठ्या एकजुटीने साजरा केल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “या वास्तूचे अधिकृत लोकार्पण झालेले नसतानाही देवीचे आगमन झाले आणि नवरात्रोत्सव सुरू झाला, हे आशीर्वादाचेच लक्षण आहे. त्यामुळे लोकार्पण कार्यक्रम आपण नंतर करू.”
कार्यक्रमस्थळी नगराध्यक्षा फरहीन बशारत, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष शरद चव्हाण व कार्यकारिणी सदस्यांसह महिला मंडळ व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. नवरात्रातील विविध कार्यक्रम आणि उत्सवासाठी मंडळाकडून सगळीकडे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
मंत्री तटकरे यांच्या भेटीमुळे मंडळाच्या कार्याला प्रेरणा मिळाली असून, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उत्सवाचे उदाहरण या कार्यक्रमातून पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके