सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथे आयोजित मेळावा स्थगित
* अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याचे भुजबळांचे आवाहन मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.) - ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी बीड येथ
सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथे आयोजित मेळावा स्थगित


* अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याचे भुजबळांचे आवाहन

मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.) - ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी बीड येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रथम शेतकऱ्यांना मदत व्हावी यादृष्टीने हा महामेळावा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत व्हिडिओद्वारे ओबीसी बांधवांना माहिती दिली आहे. तसेच प्रथमतः अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सकल ओबीसी समाज बांधवांना केले आहे.

यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर २८ सप्टेंबर रोजी हा ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केलं. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण संपले या भीतीने राज्यभरातील १४/१५ तरुणांनी आपले जीवन संपविले. याबाबत ओबीसी बांधवाना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सकल ओबीसी बांधवांनी विशेष मेहनत देखील घेतली. परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषत: बीड शहर व जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी व शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून त्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, गावागावातून अनेक कार्यकर्ते या मेळाव्याची जनजागृती गेल्या आठ दिवसांपासून करत होते. या महासभेत आपण सरकारने २ सप्टेंबरला जो जीआर काढला त्यातून कसे ओबीसींचे काय नुकसान होतंय, तो जीआर काय आहे, त्यातील शब्दरचना कशी चुकीची आहे, ती ओबीसींवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी आपण या मेळाव्यातून सांगणार होतो. गेली दहा पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे थैमान सुरु आहे. अनेक ठिकाणी महापूर आला आहे. शेतं, गुरं-ढोरं वाहून गेली आहेत. शेतकरी संकटात आहे. अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. बीड शहरात सुद्दा प्रचंड पाऊस पडतो आहे. आपण महासभेसाठी वॉटरप्रुप मंडपही उभारला होता. परंतु मंडपात गुडघाभर पाणी आहे अशी माहिती मला तेथील कार्यकर्ते सुभाष राऊत यांनी मला कळवले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत हा महामेळावा आपण पुढे ढकलूया. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मेळावा घेऊ अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.

तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, की, अतिवृष्टीमुळे जे शेतकरी अडचणी आले आहेत त्यांची मदत करा, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. शेवटी शेतकरी जगला तरच हे जग जगणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत करुया, असे आवाहन भुजबळांनी समता परिषद कार्यकर्त्यांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande