जळगाव, 27 सप्टेंबर, (हिं.स.) जिल्ह्यात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ ‘शिवाई’ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘शिवाई’ बस सेवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिक पर्यावरणपूरक, सोयीस्कर आणि प्रवाशांसाठी आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या सर्व बस वातानुकूलित असून, त्यामध्ये “पुष्पक सीट” नावाची अत्याधुनिक आणि आलिशान आसन व्यवस्था आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि दर्जेदार होणार आहे. लोकार्पण सोहळ्यादरम्यान मान्यवरांनी बसमध्ये बसून सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उपलब्ध सेवांची पाहणी केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “ही बस सेवा केवळ पर्यावरणाला पूरक नाही, तर शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.” जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले की, भविष्यात जिल्ह्यातील इतर मार्गांवरही अशा स्मार्ट आणि पर्यावरणपूरक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले, तर आमदार राजू मामा भोळे यांनी ही सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर