अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स. : )गेल्या काही दिवसात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पोषक वातावरण नसल्याने सरसकट नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासनाकडून मदत होण्यासाठी सोयाबीन, कापूस, संत्रा पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जिल्हा परिषदेतील सभागृहात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे शेत पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या नियमानुसार एका मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद किंवा पूर परिस्थिती आलेल्या भागात शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे हाती आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे हाती घेण्यात यावे. यासाठी कृषी विभागासह महसूल विभागानेही तातडीने पावले उचलावीत. येत्या कालावधीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत होईल, अशा प्रकारे निर्णय घेण्यात येईल. नुकसान भरपाई पोटी 108 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी याद्या तातडीने अपलोड करण्यात याव्यात. बेघरांना घरे मिळण्यासाठी पट्टेवाटप हा महत्त्वाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात याबाबत तातडीने कारवाई करून जिल्हाभरात पन्नास हजार पट्टेवाटप करण्याची उद्दिष्ट ठेवावे. यासोबतच पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामे उत्तम प्रकारे करण्यावर भर देण्यात यावा. जिल्ह्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याचा योग्यप्रकारे विनीयोग व्हावा. तसेच जुने झालेले जलसंधारणाचे बंधारे पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच लाडकी बहिणी योजनेत असंख्य महिलांची नावे वगळल्याने त्यांना मिळणारी मदत बंद झाली आहे. याबाबतही अपात्र महिलांची यादी तातडीने लोकप्रतिनिधींना पुरविण्यात यावी. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी