रायगड, 27 सप्टेंबर, (हिं.स.)।
क्राइस्ट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी), लवासा कॅम्पस येथे पार पडलेल्या पिथो कप २०२५ राष्ट्रीय आंतर-विद्यापीठीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील ४० विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते, वादविवादाचे स्वरूप आशियाई संसदीय पद्धतीने ठेवण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी मतभेद, विचारस्वातंत्र्य आणि संवाद यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने सहभागी विद्यार्थ्यांमध्ये टीकात्मक विचारसरणी आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य विकसित करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मतभेद आणि न्यायिक जीवन’ या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेत त्यांनी न्यायव्यवस्थेतील अनुभव, वैयक्तिक प्रवास, आणि संविधानिक मूल्यांविषयी सखोल विचार मांडले. मुलभूत अधिकारांचे रक्षण आणि बहुसंख्येच्या मताला विचारपूर्वक विरोध करण्याचे धाडस यावर त्यांनी विशेष भर दिला. या सत्रांमुळे कायद्याच्या शिक्षणात असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रगल्भता आणि नैतिकतेचे धडे मिळाले.
स्पर्धा आणि व्याख्यान सत्रांच्या यशस्वी आयोजनाबद्दल इंटर्नशिप कमिटीने समाधान व्यक्त केले असून, सहभागी आणि उपस्थित सर्वांना या कार्यक्रमातून लोकशाही, संवाद आणि वैचारिक स्वतंत्रतेच्या मूल्यांची जाणीव झाली. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क:
क्राइस्ट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी)
पुणे लवासा कॅम्पस
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके