सोलापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.) - प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत “Top Class Education In School For OBC, EBC & DNT Students” या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील टॉप क्लास शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील शाळांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EBC) व विमुक्त जाती भटक्या जमाती (DNT) मधील अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आडीच लाखांपेक्षा कमी आहे.
सदर शिष्यवृत्ती अर्ज नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण गणेश सोनटक्के यांनी जिल्ह्यातील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना संपर्क साधून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत भरून घेण्याचे आवाहन केले आहे.
ही योजना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा महत्त्वाचा आधार ठरणार असून, विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड