परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)।परभणी जिल्ह्यातील पाथरीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या न्यायालयांमुळे पाथरी, मानवत व सोनपेठ तालुक्यातील नागरिक, वकील व पक्षकार यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली.
पाथरीचे भौगोलिक स्थान लक्षात घेता न्यायालयाची गरज येथील जनतेने व वकील संघटनांनी सातत्याने मांडली होती. याबाबत त्यांनी 2024 मधील नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले होते.केली होते.
या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रस्तावास मान्यता दिली, पुढील टप्प्यात हा प्रस्ताव विधी व न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.त्यानंतर हे न्यायालय अधिकृतपणे कार्यान्वित होईल. यासाठी आवश्यक निधी, अंदाजपत्रके, आराखडे, कर्मचारी वर्ग आदींची तयारी वेगाने सुरू होईल. असे विटेकर यांनी म्हटले सध्या सोनपेठ तालुक्यातील वकील व पक्षकारांना गंगाखेडला जावे लागत आहे, तर मानवत तालुक्यातील नागरिकांना परभणीकडे धाव घ्यावी लागत आहे. पाथरी येथील वकील व पक्षकारांनाही काही कामासाठी परभणी व काही कामासाठी गंगाखेड येथे जावे लागत आहे त्यामुळे वेळ, पैसा व श्रम यांचा मोठा खर्च होत होता.. या समस्येमुळे वकील संघटना आणि बार कौन्सिलनेही आ. विटेकर यांच्याकडे न्यायालय स्थापन करण्याची मागणी केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता पाथरी, मानवत व सोनपेठ तालुक्यातील जनतेस न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, सोयीची व परवडणारी होईल पक्षकार व वकील यांचा द्रविडी प्राणायाम थांबेल, असे आ.विटेकर यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis