ओला दुष्काळ जाहीर करा - डॉ.हुलगेश चलवादी
पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिक अक्षरश: वाहून गेले आहे. तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने एका दिवसातच हिरावून घेतला. शेतकऱ्यांच्या या ''ओल्या'' जखमांवर सरकारने मायेची फुंकर घालावी अशी मा
ओला दुष्काळ जाहीर करा - डॉ.हुलगेश चलवादी


पुणे, 27 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिक अक्षरश: वाहून गेले आहे. तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने एका दिवसातच हिरावून घेतला. शेतकऱ्यांच्या या 'ओल्या' जखमांवर सरकारने मायेची फुंकर घालावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी आणि माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी केली आहे.

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे,अशात ओला दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांना सरसकट ५ ते १० लाखांची हेक्टरी मदत देवू करण्याची मागणी डॉ.चलवादींनी केली आहे. सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी, धारशिव, हिंगोली, अहिल्यानगर मध्ये मुसळधार पावसाने शेत पिकांसह शेतजमिनी, विहिरी, पाइपलाईन, बंधारे, गाव तलाव, पाझर तलावांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पुर्णत: खरडून निघाल्या आहेत. नदी शेजारील शेतींना सर्वाधिक फटका बसला आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, फळबागा आणि ऊस इत्यादी सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अशात सरकारने कुठल्याही निकषांच्या चौकटी लावणे, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे होईल.फडणवीस सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहिर करीत एकरी किमान ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत किट वितरीत करतांना काही नेत्यांनी स्वत:चा प्रचार केला. हा प्रकार संतापजनक आणि गरीब शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे. अशी खंत व्यक्त करीत अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करून असे आवाहन डॉ.चलवादींनी राजकीय नेत्यांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande