नांदुरी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी होत आहेत. राज्याबाहेरील भाविकांची संख्याही वाढत आहे. सोमवारी पहिल्या माळेला झालेल्या हलक्याशा पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली तर मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे भाविकांची गर्दी ओसरली होती. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली.
नाशिक जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे अशातच नवरात्र सुरू झाल्यानंतरही पाऊस सुरूच होता मात्र दोन दिवसापासून पावसाने उघडीप घेतलीअसल्यामुळे सप्तशृंगगडावरील बसस्थानकापासून भगवती भाविक मंदिराकडे जाताना पाहायला मिळाले. शुक्रवारी देवीचा गाभारा नारंगी-पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवल्यामुळे आकर्षक दिसत होता. शुक्रवारी सकाळ सत्रात पावसाने हजेरी लावल्याने भाविक व व्यावसायिकांची तारांबळ उडाली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, ठाणे विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर व स्मिता पाटोदकर यांनी सपत्नीक श्री भगवतीची पंचामृत महापूजा केली. याप्रसंगी कळवणचे पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
*****************************
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV