रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या निवडक रत्नागिरीकरांचा सन्मान रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांच्या गायनाची मैफिल सुद्धा रंगणार आहे. येत्या ८ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्काराचे मानकरी, प्रसिद्ध ऑर्गनवादक विलास प्रभाकर हर्षे, संगीत अलंकार परीक्षेत तबलावादनात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे मानकरी अथर्व मिलिंद आठल्ये, संगीत अलंकार परीक्षेत पखवाज वादनात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रथमेश संजय तारळकर आणि जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे प्रसाद सूर्यकांत देवस्थळी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विलास हर्षे यांचे हार्मोनियम/ऑर्गनचे लौकिक शिक्षण झाले नाही; परंतु गोविंदराव पटवर्धन, वासुदेव चन्द्रचूड, मकरंद कुंडले, विश्वनाथ कान्हेरे यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद त्यांना लाभले. भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर, नारायण बोडस, आफळेबुवा दत्तदासबुवा घाग यांसारख्या मान्यवरांना नाटक, मैफिल, कीर्तनात त्यांनी ऑर्गनसाथ केली आहे. ते संगीत नाटकांना संगीत मार्गदर्शन करतात. राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकांना पुरस्कार तसेच संगीत मार्गदर्शन व ऑर्गन साथीचे पुरस्कार मिळाले आहेत. अथर्व आठल्ये एम.ए. (संगीत- तबला, तालवाद्य) असून बीएएफ पदवी त्यांनी मिळवली आहे. तबल्याचे शिक्षण हेरंब जोगळेकर, पं. विश्वनाथ शिरोडकर, तालमणी पं. प्रवीण करकरे यांच्याकडे सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा तबला सोलो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठ राज्यस्तरीय युवा महोत्सवात रौप्य पदक पटकावले आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे, गोवा, अहमदाबाद, दिल्ली आदी शहरांत सोलो व सहयोगी सादरीकरण केले आहे. संगीत नाटकांत तबलासआथ केली आहे. संगीत जय जय गौरीशंकर या नाटकासाठी तबला साथसंगतीसाठी द्वितीय क्रमांक मिळाला. प्रथमेश तारळकर याने वयाच्या दहाव्या वर्षापासून पखवाजवादनाचे शिक्षण परशुराम गुरव, सुरेश तळवलकर यांच्याकडे घेतले. भारतात व भारताबाहेर प्रतिष्ठित संगीतसभा, समारोहात अनेक दिग्गज गायक, वादकांसोबत त्याने पखवाजवादन केले. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र, गोव्यात सर्वोत्तम वादक म्हणून त्याचा गौरव झाला आहे. तो आकाशवाणीचा मान्यताप्राप्त कलाकार असून पं. राम मराठे स्मृती गायन, वादन स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रसाद देवस्थळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक असून कोकणात स्पोर्ट्स टुरिझम वाढवण्यासाठी सक्रिय काम करत आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. अनेक सायक्लोथॉनसह कास अल्ट्रा मॅरेथॉन, लोणावळा, टाटा, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन आणि कॉम्रेड्स मॅरेथॉन त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांनी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन सुरू करून कोकणात मॅरेथॉन संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. अजिंक्य पोंक्षे एमए (संगीत) असून त्यांनी गुरू प्रसाद गुळवणी, डॉ. कविता गाडगीळ, सतीश कुंटे, नाट्यसंगीतातील गुरू मकरंद कुंडले, विलास हर्षे यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून दोन संगीत नाटकांसाठी गायक नट म्हणून रौप्यपदक पटकावले आहे. अजिंक्य पोंक्षे यांना गायन मैफलीत अथर्व आठल्ये तबलासाथ, प्रथमेश तारळकर पखवाजसाथ आणि चैतन्य पटवर्धन ऑर्गनसाथ करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई व व्यवस्थापक समितीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी