कोल्हापूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ खनिकर्म, पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख खनिज साठ्यांचे अद्ययावत सर्वेक्षण आणि उत्खनन मोजमापांसाठी नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरातील खनिज खाणपट्ट्यांमधील उत्खननाच्या मोजमापासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त केली. सध्याचे सर्वेक्षण ब्रिटिशकालीन असून, त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याला प्रतिसाद देत मंत्री शंभूराज देसाई यांनी उपसंचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, कोल्हापूर यांना खनिज साठ्यांची माहिती अद्ययावत करण्यासह सर्वेक्षणाची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून कोल्हापूर जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या अंतर्गत सोयी-सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुशोभित कार्यालयाचे उद्घाटन आज मंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म रोशन मेश्राम, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या नूतनीकरणामुळे जिल्हा खनिकर्म कार्यालयाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने खनिज साठ्यांचे सर्वेक्षण आणि उत्खननाची मोजमापे अधिक अचूक आणि पारदर्शक होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या खनिकर्म क्षेत्रातील प्रगतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar