जळगाव - शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात काल दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्य
जळगाव - शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात काल दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना धक्का लागून मृत्यू झाला. अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गायींना चारा-पाणी करून त्यांच्यासाठी पाण्याचे कुंड भरण्यासाठी ते विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले असता वीजेचा धक्का लागून बेशुद्ध पडले. कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, काल धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यानंतर इलेक्ट्रिक खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कामावर असताना झालेल्या या अपघातामुळे दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता.धरणगाव) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. दिलीप भिल धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांबावर काम करण्यासाठी गेला होता. सकाळी ९ वाजता भिल खांबावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. खांबावरून पडल्याने भिल याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप भिल याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच दिलीपच्या आई-वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande