अमरावती, 27 सप्टेंबर (हिं.स.)। विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या वारीसाठी लाखो वारकरी पायी दरवर्षी नित्यनेमाने विठ्ठलाकडे जातात. हा एक प्रकारचा ध्यास आहे. त्याप्रमाणे विज्ञान पंढरीचे वारकरी बनून आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रयोग करून विज्ञानाची जीवनाशी सांगड घालून विज्ञानाच्या ध्यासासाठी आपल्याला निरंतर प्रवास करायचा आहे. सात्त्विक अन्नाशिवाय जीवनाची पवित्रता नाही म्हणूनच विठ्ठलाची ही वारी म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ. अलका गायकवाड यांनी केले.विद्याभारती महाविद्यालय कॅम्प, अमरावती येथे गुरुवारी महाविद्यालयातील श्रोतृगृहात सायफेस्ट २०२५ विज्ञानोत्सवाचे उद्घाटन पार पडले. या वेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
व्यासपीठावर विद्याभारती शैक्षणिक मंडळाच्या उपाध्यक्ष मेजर डॉ. मिथिलेश राठौर, प्राचार्य डॉ. प्रज्ञा येनकर, भारतीय महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. अलका गायकवाड, आयक्युएसी समन्वयक डॉ. पी. जी. बनसोड, डॉ. रजनी गजबे, डॉ. जी. टी. लामधाडे, डॉ. वाय. डी. आखरे, प्रा. अथर इक्बाल, डॉ. पी. पी. खाडे, डॉ. योगिता धोटे, डॉ. शिल्पा सरवय्या आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.
डॉ. गायकवाड यांनी विज्ञान पंढरीचे वारकरी या विषयावर ओघवत्या शैलीत अनेक मुद्यांना स्पर्श केला. त्या म्हणाल्या, की कुठली श्रद्धा प्रेरणा देते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा ठरवता आल्या पाहिजे. म्हणून विज्ञानाचा धर्म विज्ञानाची वारी आपण आता स्वीकारली पाहिजे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्ये करुणा असायला पाहिजे. विज्ञानाचे तत्त्व सांगते अन्नाविना जीवन नाही; पण अध्यात्माची शिकवण आहे. आधुनिक युगात आपण ती विज्ञानरूपी वारी म्हणून स्वीकारली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. डॉ. गायकवाड यांनी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, कवयित्री बहिणाबाई यांच्या विचारांचे दाखले देऊन आपले विचाराला दुजोरा दिला.
तत्पूर्वी, प्रास्ताविकातून डॉ. पी. जी. बनसोड यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित सायफेस्ट २०२५ च्या आयोजनामागील भूमिका विशद केली. मेजर डॉ. मिथिलेश राठौर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आंतरविद्या शाखीय अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे आज सायफेस्टच्या बीज भाषणाकरिता मराठीच्या साहित्यिक संशोधक डॉ. अलका गायकवाड यांना पाचारण केल्याचे सांगितले आहे. सूत्रसंचालन डॉ. मोनाली घुरडे यांनी केले, तर आभार डॉ. विजय मसंद यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी