शनी शिंगणापूर देवस्थानातील कार्यालय सील; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
अहिल्यानगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानात गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत होते. देणग्यांचा अपहार, खर्चातील अनियमितता आणि कामकाजातील ढिसाळपणामुळे विश्वस्
Shani Shingnapur Devasthan


अहिल्यानगर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानात गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत होते. देणग्यांचा अपहार, खर्चातील अनियमितता आणि कामकाजातील ढिसाळपणामुळे विश्वस्त मंडळाविरोधात असंतोष शिगेला पोहोचला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून थेट प्रशासकीय नियंत्रण आपल्या हाती घेतले. मात्र यानंतरही गैरव्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची हेराफेरी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाल्याने शनिवारी सकाळी धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील करून तेथील सर्व कागदपत्रे सुरक्षित करण्यात आली.

ही कारवाई होत असताना अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. सर्वात मोठे प्रश्नचिन्ह म्हणजे कारवाईच्या वेळी कार्यकारी अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनावरील संशय अधिकच गडद झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या साक्षीनेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या मते, भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून कार्यालयाला सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनी शिंगणापूरसारख्या राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानावर जिल्हाधिकाऱ्यांना अशी कठोर कारवाई करावी लागणे ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भाविकांमध्येही संतापाची लाट उसळली असून एवढ्या मोठ्या देवस्थानात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतोय, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande