रत्नागिरी, 27 सप्टेंबर, (हिं. स.) : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूपयोगिनी पुरस्कार पर्यटन उद्योजिका सौ. अमृता करंदीकर यांना प्रदान करण्यात आला.
वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन यांनी पुरस्कार प्रदान केला. पुरस्काराला उत्तर देताना अमृता करंदीकर म्हणाल्या की, रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांना आपल्या जागेवरून पुन्हा जागेवर आणून सोडणारी पर्यटन सेवा गरजेची होती. या गरजेतून पुढाकार घेऊन काही नियोजित टूर आम्ही आयोजित केल्या. लोकांची वाढती मागणी, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन घरगुती, शाकाहारी जेवणाची सोय पुरविण्याची जबाबदारीही आम्ही घेतली. अमृता ट्रॅव्हल्स म्हणजे विश्वास, आनंद आणि सुरक्षितता याची खात्री हा लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हाला समाधान वाटते.
आज २५ वर्षे पर्यटन क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका, ज्यांच्यामुळे अनेकांना रोजगार मिळाले. अशा अमृता करंदीकर, पती आणि आता मुलेही या क्षेत्रात कार्यरत आहेत, अशा शब्दांत करंदीकर कुटुंबाच्या श्रमांचे, नियोजनाचे कौतुक कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन अलका बेंदरकर यांनी केले.
यानंतर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवात चालू असणार्या व्याख्यान मालेतील दुसरे पुष्प प्रा. सौ. अंजली बर्वे यांनी गुंफले. राजस्थानच्या मीराबाईंचे चरित्र आणि त्यांची भजने ५०० वर्षांनंतरही लोक विसरले नाहीत. राजकारणपटुत्व, युद्धनैपुण्य, हजरजबाबीपणा, दूरदृष्टी हे राजपूत घराण्याचे सर्व गुण त्यांच्यात होते. तरीही त्या विरक्त, प्रेमळ तपस्विनी, तेजस्विनी होत्या. श्रीकृष्ण हाच त्यांचा श्वास, निदिध्यास होता. अशा मीराबाईंच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या चरित्राचे कथन सौ. अंजली बर्वे केले.
सौ. अलका बेंदरकर यांनी मीराबाईंचे भजन म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी