मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले 2047 मधील विकसित भारताचे स्वप्न साकारत असताना महाराष्ट्र देखील त्याच तोडीने प्रगती करत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न निश्चितपणे गाठेल असा ठाम विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
टेफला आयोजित 'Think Big Think Maharashtra' या अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईतील पवई स्थित 'वेस्टीन' मध्ये झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जी. चंद्रशेखर, रेणुका शुगरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अतुल चतुर्वेदी, सुवीण ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बजोरिया, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर असोसिएशन (SEA) चे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक कंपनी 'टेफला'चे संचालक आदिल सिंग यांनी थिंग बिग थिंक महाराष्ट्र या संकल्पनेची पार्श्वभूमी स्पष्ट करताना महाराष्ट्रातील उद्योगांच्या अमाप संधी आणि महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या कम्युनिटीला सोबत घेऊन राज्याचा आणि देश विकसित करण्याच्या संकल्पनेला बळ देण्याचा असल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्रवर प्रेम करणारे आणि धोरण करते आणि विविध समाज घटक एकत्र घेणार असल्याचे आदिल सिंग यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले, ''Think Big Think Maharashtra' या अभिनव उपक्रमाची सुरुवात तरुण तडफदार मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होत आहे हीच अभिमानाची गोष्ट आहे. शेलार यांनी या निमंत्रण स्वीकारले. भविष्यातही शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार असल्याने तेच या उपक्रमासाठी योग्य व्यक्ती आहेत.
माझे तात्विक मार्गदर्शन असा पाशा पटेल यांचा उल्लेख करत आशिष शेलार यांनी 'बिग थिंक बिग महाराष्ट्र' उपक्रमाला सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा दिल्या.
मंत्री आशिष शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात असल्याचे जाहीर केले आहे. या विकसित भारताच्या स्वप्नामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे याच दरम्यान विकसित महाराष्ट्र देखील आकाराला येईल तो प्रगत आणि सर्व समावेशक असेल.
विकसित महाराष्ट्रामध्ये सर्व घटकांना सोबत घेऊन जात असताना शेती या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.
शेलार म्हणाले, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. बारामती मध्ये याचे प्रयोग यशस्वी झाले असून AI माध्यमातून महाराष्ट्राचा शेतीचा चेहरा मोहरा बदलण्याचे सरकारचे धोरण आहे. बेटा या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या कंपनीसोबत करार करून व्हाट्सअप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत अध्ययवत माहिती सोबतच मातीचे नमुने आणि खतांच्या मात्रा ठरवणे शक्य होणार आहे. AI तंत्रज्ञान युक्त शेतीचे अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत सोबतच स्थानिक मराठी भाषेत देखील कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
शेतीमध्ये बाजार ही मोठी समस्या आहे त्यासाठी देखील E- प्लॅटफॉर्म तयार करून शेताच्या बांधापासून तर पोर्टपर्यंत जलद वाहतुकीचा मार्ग निश्चित करण्यात येईल.
राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग हा थेट बंदरांशी जोडण्यात आला आहे. रेल्वेसोबत विशेष उद्देश कंपनी (SPV) तयार करून जास्तीत जास्त रेल्वे कनेक्टिव्हिटी तसेच उडान प्रकल्पाच्या माध्यमातून नवे विमानतळ आकाराला येत आहे. शेजारच्याच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विकासाच्या माध्यमातून नवे विकासाचे केंद्र आकाराला येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर