जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यासह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजेच उधना ते ब्रह्मपूर दरम्यान नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. या गाडीमुळे नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होऊ शकणार आहे.पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी उधना-ब्रह्मपूर दरम्यान नवीन अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस (०९०२१) शनिवारी (दि. २७) सकाळी १०.५० वाजता उधना येथून सुटणार ते जळगाव स्थानकावर दुपारी ४ वाजून २५ मिनिटाने तर भुसावळला ४ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल. यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३५ वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल. तसेच ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस (०९०२२) आज शनिवारी (दि. २७) – दुपारी १२ वाजता ब्रह्मपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटाने तर जळगाव स्थानकावर दुपारी २ वाजून १० मिनिटाने पोहोचेल. यांनतर रात्री ९ वाजता उधना येथे पोहोचेल. ५ ऑक्टोबरपासून उधना ते ब्रम्हपूर दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस आठवड्यातून एक दिवस दर रविवारी नियमितपणे धावणार आहे. उधना येथून ती सकाळी ०७.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०१.५५ वाजता ब्रम्हपूरला पोहोचेल. याशिवाय, ब्रम्हपूर ते उधना ही गाडी सहा ऑक्टोबरपासून दर सोमवारी रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी ०८.४५ वाजता उधना पोहोचेल. दोन्ही गाड्यांना खान्देशातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या अमृत भारत एक्सप्रेसला तब्बल ११ सामान्य (अनारक्षित) श्रेणी आणि आठ स्लीपर व इतर डबे जोडले जाणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे आधुनिक आसने आणि झोपण्याची सोय देखील असणार आहे. नवीन अमृत भारत एक्सप्रेस आधुनिक सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. विशेषतः नॉन-एसी स्लीपर आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलगढ, केसिंगा, मुनीगुडा, रायगडा, पार्वतीपूरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड व पलासा या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर