परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी परभणी जिल्ह्याकरिता दि. 27 व 28 सप्टेंबर 2025 हे रोजी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. एकूण जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
परभणी जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना हे धरणे, ढालेगाव, तारुगव्हान, मुद्गल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न पातळी व मध्यम प्रकल्प इत्यादी पुर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे सदर धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव इत्यादीमधून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पुर्णा व दुधना आणि सदर नद्यांच्या उपनद्या, ओढे नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत नागरिकांनी पर्यटन स्थळे नदी काठ व रस्त्यावरून पाणी वाहत असेल अशा ठिकाणाहून धोकादायकरित्या प्रवास करणे टाळावे, स्थानिक पोलिस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता निश्चित करणे इत्यादी बाबत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तसेच पूर्णा तालुक्यात मौजे चुडावा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण 03 स्थानिक नागरिकांना अग्निशमन दलाच्या, आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे. सदर पूर परिस्थितीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय सेनादलाची तुकडी पाचारण करण्यात आली आहे. सदरील तुकडीचे नेतृत्व मेजर कमाल हे करत आहेत, ही तुकडी छत्रपती संभाजीनगरहून परभणी करिता रवाना झालेली आहे. सदर तुकडी जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे.
एकूण जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
तथापि, काही समाजकंटक रात्री उशिरा पूर परिस्थिती बाबत प्रशासनास चुकीची माहिती देवून अफवा पसरविण्याचा ही प्रयत्न करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. असे केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 चे प्रकरण 10 मधील कलम 54 आणि अन्य प्रचलित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी नागरिकांनी खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, मान्सून कालावधीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांकजिल्हा 02452 226400, टोल फ्री क्रमांक 1077 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पवन खांडके, मो. 9975013726 / 7020825668 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis