पुणे, 27 सप्टेंबर, (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या '4G' तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार २० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते '4G' नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदीर येरवडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल दी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यातील ९० टक्के सेवा एन्ड टू एन्ड डिजीटल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलवरून सेवा उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.
बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, यातील ९ हजार २० टॉवर्स महाराष्ट्रातील आहे. देशातील २४ हजार ६८० हजार गावांना या टावर्सच्या माध्यमातून '4जी' नेटवर्क उपलब्ध होणार आहे. देशाला विकसीत करण्यासाठी परस्पर दळणवळण (कम्युनिकेशन) महत्वाचे आहे. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाचा मार्ग हा दळणवळण असल्याचे म्हटले होते. त्यांनी दळणवळणाच्या दृष्टीने देशाला आणि गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केल्या. आता २१ व्या शतकात विकासासाठी केवळ रस्तेच नाही तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असल्याचे लक्षात आले. मोबाईल कनेक्टीव्हीटी आणि इंटरनेट गावात पोहोचविल्याशिवाय या शतकातील विकास गावापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे गावागावात हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी 4जी टॉवर्सची निर्मिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु