अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १२ रुग्णवाहिका दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत आहेत. यामुळे विशेषतः मेळघाटातील रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासनादेशातील तरतुदींच्या अभावामुळे या रुग्णवाहिका रस्त्यावर आणण्यात अडचणी येत आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सध्या २०० हून अधिक रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यापैकी सुमारे १२ वाहने नादुरुस्त झाल्याने बंद आहेत. यातील बहुतांश रुग्णवाहिका मेळघाटमधील असल्याने तेथील दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नाही. सेमाडोह येथील आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका टायर खराब झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद आहे, अशीच स्थिती इतर अनेक गावांमध्येही आहे.
शासनाने नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हा परिषदेला डीपीसीतून ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, एकूण तरतुदीपैकी २० टक्के रक्कम दुरुस्तीवर खर्च करण्याची मुभा जिल्हा शल्य चिकित्सकांना दिली असली तरी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तशी मुभा देण्यात आलेली नाही. यामुळे नादुरुस्त वाहनांची दुरुस्ती रखडली आहे.
या अडचणीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सदर शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढेही हा मुद्दा मांडला. पालकमंत्र्यांनी यावर सकारात्मकता दर्शविली असून, लवकरच शासनादेशात बदल केला जाईल, असे संकेत दिले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत ३४१ आरोग्य उपकेंद्र, ६५ आयुर्वेदिक दवाखाने, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र, आठ ग्रामीण रुग्णालये आणि सहा उपजिल्हा रुग्णालये चालवली जातात. गरोदर माता आणि बालकांसाठी १०२ क्रमांकाने १४० रुग्णवाहिका सेवा देतात, तर इतर रुग्णांसाठी १०८ क्रमांकाने सेवा उपलब्ध आहे. याशिवाय, पूर्वी पुरवलेल्या सुमारे ८० रुग्णवाहिका विशेषतः मेळघाटात धावतात. मेळघाटातील खराब रस्ते आणि पावसाळ्यामुळे वाहने वारंवार नादुरुस्त होतात, ज्यामुळे नियमित दुरुस्ती आवश्यक ठरते. मात्र, निधीच्या तरतुदीअभावी प्रशासनासमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी