अचलपूर पोलिसांकडून ५६ वाहने जप्त; ३० हजारांचा आकारला दंड
अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.) शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अचलपूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवत ५६ वाहने जप्त केली. कागदपत्रे अपुरी, परवाना व विमा नसणे, अल्पवयीन चालकांकडून वाहने चालवली जाणे आणि वेगमर्यादा ओलांडणे यांसार
अचलपूर पोलिसांकडून ५६ वाहने जप्त; ३० हजारांचा आकारला दंड


अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.)

शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अचलपूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवत ५६ वाहने जप्त केली. कागदपत्रे अपुरी, परवाना व विमा नसणे, अल्पवयीन चालकांकडून वाहने चालवली जाणे आणि वेगमर्यादा ओलांडणे यांसारख्या गंभीर उल्लंघनांवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ४६ दुचाकींवर २३,५०० रुपये, तर ११ चारचाकी वाहनांवर ६,३०० रुपये असा एकूण ३०,१०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंड भरल्यानंतर वाहने सोडण्यात आली.

ही मोहीम अचलपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जमील खान यांच्या पथकाने केली.

“शहरात अनेक अल्पवयीन युवक परवाना व कागदपत्रांशिवाय मोठ्या वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. काही जण तर सायलेंसर काढून मोठ्या आवाजात वाहने चालवतात. अशा बेफिकीर वाहनचालकांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहील.”

पोलिस विभागाने शहरवासीयांना आवाहन केले आहे की १८ वर्षांखालील मुलांना वाहन देऊ नये. सर्वांनी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर दंडाची तयारी ठेवावी.

ही कारवाई रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande