अमरावती, 28 सप्टेंबर (हिं.स.) | तिवसा तालुक्यातील वणी गावात महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. गावातील शेतकरी दिनेश टेकाडे यांची गर्भवती गाय रस्त्यालगत असलेल्या धोकादायक डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉइंट) च्या संपर्कात आल्याने विजेच्या शॉकने जागीच मृत्यूमुखी पडली. या घटनेमुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. टेकाडे यांची गाय पाणवठ्यावरून परत येत असताना गावठाणातील रस्त्यालगत असलेल्या डीपीजवळून जात होती. याचवेळी तिचा स्पर्श डीपीवरील उघड्या वायरला झाल्याने ती विजेच्या तडाख्यात अडकली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला. वणी फिडरवरील वीज पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता. त्यानंतर महावितरणचे अधिकारी आणि तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.ग्रामस्थांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, हा डीपी अनेक दिवसांपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत होता.
या संदर्भात नागरिकांनी महावितरणकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, मात्र दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकरी दिनेश टेकाडे यांना या घटनेमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मृत गाय गर्भवती होती, त्यामुळे दुहेरी नुकसान झाले आहे. महावितरण विभागाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी आणि गावातील धोकादायक डीपी त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “ही गाय जणू गावाच्या रक्षणासाठीच बळी गेली. तिच्यावर ओढवलेला विजेचा धोका कुण्या माणसाच्या वाट्याला आला असता, तर आणखी मोठा अनर्थ घडला असता.”
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी