मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळावर तीन नव्या सदस्यांची नियुक्ती
नाशिक, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री आचार्य देवव्रत यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर तीन महत्वपूर्ण व्यक्तींची नेमणूक केली आहे. डॉ. गुजराथी दत्तात्रय मनोहर
मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळावर तीन नव्या सदस्यांची नियुक्ती


नाशिक, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री आचार्य देवव्रत यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर तीन महत्वपूर्ण व्यक्तींची नेमणूक केली आहे. डॉ. गुजराथी दत्तात्रय मनोहर, डॉ. अक्षया निकुंभ व श्री प्रसेनजित श्रीकृष्ण फडणवीस अशी नियुक्त सदस्यांची नावे आहेत. ही नेमणूक तीन वर्षांसाठी असणार आहे. विद्यापीठ अधिनियम १९८९ नुसार व विद्यापीठाचा कारभार अधिक पारदर्शक व विश्वासार्ह्य व्हावा यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळावर निवड झालेले सदस्य डॉ. गुजराथी दत्तात्रय मनोहर हे पीएच.डी., एम.फिल., एम.कॉम. आणि बी.कॉम. यांसारख्या उच्च पदव्या विशेष प्रावीण्यासह मिळवलेले व्यवस्थापन आणि वाणिज्य क्षेत्राचे तज्ज्ञ व्यक्ति आहेत. त्यांना या क्षेत्रात ३८ वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी नाशिक येथील अशोका बिझनेस स्कूलचे संचालक आणि अशोका सेंटरचे प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना पुणे विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट वाणिज्य शिक्षक म्हणून जी.बी. कुलकर्णी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाच्या कॉस्टिंग, अकाउंटन्सी, बीबीए बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि शैक्षणिक परिषदेचे माजी सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते एक यशस्वी संशोधक मार्गदर्शक असून, त्यांनी ९ पीएच.डी. व ६ एम.फिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे २५ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत; याव्यतिरिक्त, ते सहकार भारती, नाशिकचे उपाध्यक्ष, वेगो लायब्ररी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक अशा विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत.ते अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एस. एन. आर्ट्स, डी. जे. एम. कॉमर्स आणि बी. एन. एस. सायन्स महाविद्यालयात कार्यरत आहेत.

दुसऱ्या तज्ज्ञ व्यक्ति डॉ. अक्षया निकुंभ यांची निवड संशोधन क्षेत्रातून झाली आहे. त्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) येथील हवामान अभ्यास केंद्रात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगळूर येथून हवामान आणि महासागर विज्ञानात पीएच.डी. पूर्ण केली असून, त्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी रॉडम कुटुंब पदक (Rodham Family Medal) मिळाले आहे. यापूर्वी, त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठ आणि NOAA-GFDL मध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधन सहकारी म्हणून काम केले आहे. मोठ्या प्रमाणातील हवामान गतिकी, पर्जन्य तीव्रता आणि मान्सून हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय असून, त्यांचे महत्त्वपूर्ण शोधकार्य जिओफिजिकल रिसर्च लेटर्स आणि जर्नल ऑफ अॅटमॉस्फेरिक सायन्स यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांना यंग फॅकल्टी पुरस्कार (IIT बॉम्बे २०२४), CIMES पोस्टडॉक्टोरल फेलोशिप आणि फुलब्राइट कलाम हवामान फेलोशिप यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार आणि फेलोशिप्स प्राप्त झाले आहेत. त्या सध्या मान्सून मिशन फेज III अंतर्गत एका मोठ्या संशोधन प्रकल्पात सह-मुख्य अन्वेषक (Co-PI) म्हणून कार्यरत आहेत.

तिसरे तज्ज्ञ व्यक्ति श्री. प्रसेनजित श्रीकृष्ण फडणवीस यांची पार्श्वभूमी औद्योगिक क्षेत्रातील आहे. ते पुण्यात 'एसपीपीयू एज्युटेक'चे संचालक आहेत. ते सायबर सुरक्षा व बौद्धिक संपदा विषयातील तज्ज्ञ आहेत. विद्यार्थी दशेपासून श्री. फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. २०१७-२०२२ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. तसेच याच विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून गेली आठ वर्षे ते कार्यरत आहेत. अधिसभेत विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande