पुणे, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा एका वर्षाच्या कालावधीत 71 कोटी 74 लाख रुपये खर्चाचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजे प्रकल्प उभारणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. सदर प्रकल्पास उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.
माळेगाव कारखान्याच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, उपाध्यक्ष संगीताताई कोकरे, सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.
अजित पवार यांनी सीबीजी प्रकल्पाबाबत व्हीएसआयच्या तज्ज्ञांबरोबर चर्चा करून तसेच वेगवेगळ्या कारखान्यांना भेटी देऊन तेथील चालू प्रकल्पाबाबत माहिती घेऊन प्रकल्प करणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे सांडपाणी वापरात येऊन नदीप्रदूषण होणार नाही. या प्रकल्पाच्या उत्पादनातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना जास्तीचे पैसे मिळतील, असे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु