अतिवृष्टी, पूर परिस्थितीवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा!
* जयंत पाटलांची राज्यपालांना पत्र लिहित विनंती मुंबई, २८ सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा, असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्
अतिवृष्टी, पूर परिस्थितीवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा!


* जयंत पाटलांची राज्यपालांना पत्र लिहित विनंती

मुंबई, २८ सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा, असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे.

जयंत पाटील यांनी राज्यपालांना संबोधित करताना म्हटले आहे की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून तर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतीचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकले आहेत, तर काही लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे.

मी मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांवर मोठा बिकट काळ ओढावला आहे. पूराच्या पाण्यामुळे फक्त पिकं नष्ट झाली असे नाही तर शेतकऱ्यांची जमीनही खरडून वाहून गेली आहे. नुकसान इतके झाले आहे की शेतकरी वर्षभर राबला तरी परिस्थिती स्थिरस्थावर होणार नाही असे दिसते.

अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. पण सरकार असे करताना दिसत नाही. महोदय, हे काही योग्य नाही. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी व तात्काळ निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विनंती करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande