छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सर्वत्र नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून मदत व बचाव पथकांनी आतापर्यंत पुरात वेढल्या गेलेल्या ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका केली आहे. जायकवाडी सह जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमधून विसर्ग सुरु आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून प्रशासन सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५८१.२ मि.मी इतके असून आज अखेर ८१८.५ मि.मी इतके पर्जन्यमान झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ११०.३ मि.मी इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले. एकूण वार्षिक १४०.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८४ पैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून दुरध्वनीवरुन मदत व बचाव कार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्री कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दर दोन तासाला अहवाल पाठविला जात आहे. जिल्ह्यातील मदत व बचाव कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितल
जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. पालकमंत्री स्वतः अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून मदत व बचाव कार्यावर लक्ष देऊन होते. नारायणपुर येथे आ. रमेश बोरनारे हे त्यांच्या समवेत होते.
प्रशासन २४ तास अलर्ट
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन जिल्हा ते गाव पातळीपर्यंत २४ तास अलर्ट आहे. सर्वच अधिकारी, कर्मचारी यांना आपापल्या मुख्यालयी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. प्रत्येक आपत्तीच्या ठिकाणी वेळीच आगाऊ सुचना देऊन नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. प्रतिसाद कालावधी शून्यावर आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिवितहानी रोखणे हा पहिला उद्देश आहे,असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहयोग द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
३५४ नागरिकांची सुखरुप सुटका
दि.२७ रोजी मदन झब्बू राठोड (वय ५५, रा. गराडा, ता. कन्नड) हे ब्राम्हणी नदीत वाहून गेले असून शोध मोहीम सुरू आहे, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. याशिवाय सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांड्यावरील ६ शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे ६ काटशिवरी फाटा येथे ३ भिवगाव येथे २७ व बाबुळगाव येथे १७ नागरिक पुरात अडकले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यात भिवगाव येथे २७म बाहुळगाव येथे १५, नारायणपूर येथे १८ जणांना, हडस पिंपळगाव येथे १ जणास सुखरुप बाहेर काढण्यात आले. वैजापूर नगरपरिषद क्षेत्रात २५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कन्नड तालुक्यात अंतापूर येथे ४, देवगाव रंगारी येथे ६ नागरिकांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. गंगापूर तालुक्यात अमळनेर येथे २२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसेच काटे पिंपळगाव येथे ४ तर पेंडापूर येथे ५ , नरसापूर येथे १ व्यक्ति अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. मालूंजा येथील दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
जिल्ह्यात सायं.४ वा. पर्यंत एकूण १५ गावांमध्ये पुरात अडकलेल्या ३७९ पैकी ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका करुन त्यांना सुरक्षित ठिकाणि हलविण्यात आले आहे.
जायकवाडी धरणातून २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग
जायकवाडी धरणाची पाणीसाठा स्थिती ९७.८० टक्के इतकी असून सध्या २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.पैठण तालुक्यात गोदावरी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरबाधितांची व्यवस्था प्रशासनामार्फत शाळांमध्ये करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis