परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा प्रकल्पातून तब्बल ७७,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या वाढत्या पाणीपातळीचा परिणाम येलदरी प्रकल्पावर होत असून येथूनही पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून या विसर्गात लक्षणीय वाढ करण्यात येणार असल्याची माहिती येलदरी पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
या विसर्गामुळे येलदरी धरणाखालील पूल पूर्णपणे पाण्याखाली जाणार असून, त्यामुळे जिंतूर – सेनगाव मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. नदीकाठच्या भागातील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी हलवावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे सूचनावजा आवाहन येलदरी पूर नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या येलदरी धरण क्षेत्रासह खडकपुर्णा प्रकल्पातून वाढलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेता, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्कता व सावधानता बाळगणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis