परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आर.पी.हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड येथे ० ते १८ वर्षे वयाच्या लहान मुलांसाठी मोफत 2 डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात १४२ बालकांची मोफत 2 डी इको तपासणी करण्यात आली असून, जगप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आ.डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरामुळे परभणी व परिसरातील अनेक लहान मुलांना हृदयविकारापासून मुक्त होण्याची संधी मिळाली. यापूर्वीही आर. पी. हॉस्पिटलने अशा शिबिरांद्वारे अनेक बालकांना नवजीवन प्रदान केले आहे.
यावेळी बोलताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, “हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लहान मुलांना वेळीच उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हे शिबिर सामान्य कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरले आहे. अशा संधीचा लाभ घेऊन आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन केले.
आर.पी.हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांनी सांगितले, “आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देतो.परभणी जिल्ह्यातील लहान मुलांना हृदयविकारापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आर.पी. हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमीर तडवी,आरोग्य विभाग प्रमुख राहुल कांबळे, पंकज गंगवाल, स्वप्नील बोर्डे,मकरंद कुलकर्णी, राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis