महेंद्र थोरवेंच्या आमदारकीच्या निकालाविरोधात सुधाकर घारे सुप्रीम कोर्टात
रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। कर्जत विधानसभा मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने आमद
महेंद्र थोरवे आमदारकी कायम; सुधाकर घारे  यांच सुप्रीम कोर्टात धाव


रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

कर्जत विधानसभा मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाजूने निकाल देत घारे यांची याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात घारे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.

कर्जत विधानसभा निवडणुकीत काही हजार मतांनी पराभूत झाल्यानंतर सुधाकर घारे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक निकालाला आव्हान दिले होते. आपल्या याचिकेत घारे यांनी आरोप केला होता की, विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारांना भडकावले, धमकावले तसेच “सुधाकर घारे” नावाचा डमी उमेदवार उभा करून त्यांचा विजय हिरावून घेतला. या गंभीर आरोपांवर गेली सहा महिने मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र अखेर न्यायालयाने आमदार थोरवे यांच्या आमदारकीला मान्यता देत घारे यांची याचिका फेटाळली.

न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात लागल्यानंतर घारे अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दारात टकटक केली आहे. “आपला विजय उशिरा का होईना पण होणारच. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. सत्याच्या लढाईत मी मागे हटणार नाही,” असा ठाम विश्वास घारे यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील अ‍ॅड. आरिफ बुकवाला, अ‍ॅड. महेश बुकवाला आणि अ‍ॅड. पूजा थोरात यांनी बाजू मांडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यासाठी कोणते नामांकित वकील काम पाहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या अपीलामुळे कर्जत मतदारसंघात नव्या घडामोडींना उधाण आले आहे. एकीकडे महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीला न्यायालयीन आधार मिळाला असला तरी घारे यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले आव्हान आगामी राजकीय वातावरण तापवणारे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande