रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.) भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २७ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टी होणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शहरी भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
नागरिकांसाठी सूचना देण्यात आल्या कि
या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे, पावसाळ्यात मोठ्या झाडाखाली थांबणे टाळावे, नदी-नाल्यांवरून पाणी वाहत असताना पूल किंवा रस्ता ओलांडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासकीय व अधिकृत माध्यमांवरून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाने विशेषतः नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे व परिस्थिती गंभीर असल्यास तात्काळ मदतीसाठी संपर्क क्रमांक वापरण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाची तयारी:
अतिवृष्टी व संभाव्य आपत्ती परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. सर्व जिल्ह्यांमधील नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवण्यात आले असून आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. सखल भागात पाणी उपसा पंप बसविण्यात आले असून जुन्या व धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी वीज वितरण पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच साखळी आरे, फीडर संरक्षण युनिट्स आणि रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज आहे. कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणांचा दररोज आढावा घेऊन स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक:
संभाव्य पूरस्थिती उद्भवू शकणाऱ्या जिल्ह्यांसाठी विशेष आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. ठाणे – ९३७२३३८८२७, रायगड – ८२७५१५२३६३, रत्नागिरी – ७०५७२२२३३, पालघर – ०२५२५-२९७४७४, सिंधुदुर्ग – ०२३६२-२२८८४७, तसेच मुंबई शहर व उपनगर – १९१६ / ०२२-६९४०३३४४ वर संपर्क साधता येईल. अन्य जिल्ह्यांसाठीही (सातारा, पुणे, धाराशिव, बीड, नांदेड, लातूर इ.) स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याशिवाय राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC), मंत्रालय, मुंबई येथील अधिकारी २४x७ उपलब्ध असून नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल क्रमांक ९३२१५८७१४३ दिले आहेत. परिस्थितीनुसार अद्ययावत माहिती सतत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाचे आवाहन:-
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे, प्रशासनावर विश्वास ठेवण्याचे व अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन व सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके