नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आपल्या देशाला विचारांची परंपरा आहे सर्व क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सत्कार हा त्यांच्यासाठी थोडा आणि समाजावर संस्कार करण्यासाठी जास्त असा असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ लेखक डॉ. प्रा. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्क विभागातर्फे काल 'नवदुर्गा सन्मान' सोहळ्याचे आयोजन गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात आले होते या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. निशिगंधाताई मोगल होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक कैलास नाना साळुंखे तर शहर संघ चालक डॉ. विजय मालपाठक होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. गोविलकर पुढे म्हणाले, आजच्या परिस्थितीला प्रत्येकाने स्वजागरण केले पाहिजे. कारण आपणच आपल्याला ओळखतो का? त्यासाठी आपण स्वतः जागरूक आहोत का? हे ओळखून प्रत्येकाने जागरूक झाले पाहिजे आणि तेथूनच खरी सुरुवात होते. एकदा स्वजागरण झाले की त्यातूनच आपल्या क्षमतांचा परिचय होतो, काहींना आपल्या क्षमतेचा परिचय करून घ्यावा लागतो. ज्यांना आपल्या क्षमतेचा परिचय आपोआप होतो ते भाग्यवान आहेत. स्त्री असो पुरुष असो पहिले दायित्व हे आपले कुटुंब आहे, त्यांचे त्याचे प्रबोधन हे दुसरे दायित्व आहे. असे सांगून डॉ. गोविलकर म्हणाले की, कुटुंबापुरते मर्यादित राहून चालणार नाही, मी आणि माझे कुटुंब सुखी, समाधानी असेल तर समाज सुरक्षित असला पाहिजे, समाज सुसंस्कृत असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे त्यासाठी समाज जागृत असला पाहिजे. त्यासाठी नागरिकांचे दायित्व केले पाहिजे तसेच देशाचाही विचार केला पाहिजे ते केवळ शासनावर सोडून चालणार नाही शासन कदाचित भौतिक गोष्टी करेल असं काय संस्कृती गोष्टी समाजातल्या आपणच करायच्या आहेत म्हणून मग आपल्याला नागरिकांचे प्रबोधन करणे हे सुद्धा आपलेच दायित्व आहे. व समाजापुरते राहून चालणार नाही तर देशाचाही विचार केला पाहिजे. कारण शेवटी आज आजूबाजूला काय चाललंय हे आपण बघतोय ना,
बांगलादेशमध्ये काय झाले? नेपाळमध्ये काय झाले? आपल्या आजूबाजूचे सगळे देश बघा जगभरातले देश बघा आपल्या लक्षात येईल. मी खूप चांगला आहे, माझे कुटुंब चांगले आहे. माझा समाज चांगला आहे, पण माझ्या देशात मात्र काहीतरी गडबड चालू आहे. संस्थांना कसं राहील सगळं ठीक ठाक. म्हणून पुढचा टप्पा जो आहे तो स्वदेश. संघाने या शताब्दी वर्षात हेच सूत्र घेऊन काम सुरू केला आहे. स्वतःच्या जागरणापासून स्वदेश च्या सगळ्या गोष्टींच जागरण हे करण्याचा पाया कोण आहे तर ती मातृशक्ती आहे असे डॉ. गोविलकर शेवटी म्हणाले.
यावेळी माजी आमदार डॉ. मोगल म्हणाल्या, संघातून उत्तम नागरिक घडविला जातो, मात्र स्व केंद्रीत समाज निर्माण होतोय की काय अशी परिस्थिती असून त्याची भीती वाटू लागली आहे. प्रत्येक जण स्वकेंद्रीत झाला असल्याने देशाच्या भविष्याची काहीच काळजी नाही याची खूप चिंता वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. आपली कुटुंब व्यवस्था दुबळी होत चालली आहे स्वतःपुरता विचार करणे सुरू असल्यामुळे त्याग, शेजारधर्म हे शब्द देखील विसरत चालले आहे. आजची युवा पिढी शिक्षित आहे याचा अभिमान वाटतो. स्मार्ट आहेत, जनरल नॉलेज भरपूर आहे, टॉपर आहेत पण कुटुंबाला धरून राहणे या गोष्टी नाहीशा व्हायला लागल्या आहेत. त्याची लाज वाटते लवकर उठण्याची पद्धत बंदच झाली आहे. नाते संबंध नाहीत, आणि आहे तर ती टिकवली जात नाही. आहेत त्यांच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे अशा भावना डॉ. मोगल यांनी व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV