लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर येथे लातूर ते हडपसर दसरा-दिवाळी विशेष रेल्वे लातूरकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या नवीन सुरू झालेल्या विशेष रेल्वेस लातूर रेल्वे स्थानकात लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार शिवाजी काळगे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
लातूर व परिसरातील नागरिकांची सणासुदीच्या काळात सुखरूप व माफक दरात प्रवासाची गरज ओळखून लातूर ते हडपसर ही विशेष रेल्वे लातूरकरांसाठी सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेने लातूर-मुरुड पर्यंतचा प्रवास केला,या रेल्वेचे मुरुडकरांनी मुरुड रेल्वे स्थानकात थांबा मिळाल्यामुळे जोरदार स्वागत केले.मुरुड रेल्वे स्थानकात रेल्वेस थांबा मिळवून देण्याच्या मागणीची दखल घेत मागणी पूर्ण केल्याबद्दल मुरुडकरांच्या व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
मुरूड परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांच्या साठी प्रयत्न केल्याचे समाधान आहे. मुरूडकरांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन तसेच त्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल अनेकांनी कौतुक केले.
यावेळी आ. विक्रम काळे,काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. दिनेश नवगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष (श. प.) संजय शेटे, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष सुभाष घोडके, मध्य रेल्वे सोलापूर विभाग सल्लागार समिती सदस्य संजय निलेगावकर यांच्यासह आदी अधिकारी,पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis