रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवरील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटक त्रस्त झाले आहेत. माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने ऑगस्ट महिन्याचे तब्बल २८ लाख ३८ हजार १८० रुपयांचे थकीत वीज बिल महावितरणकडे न भरल्यामुळे, १७ सप्टेंबर रोजी महावितरणने नोटीस देऊनही नगरपरिषदेने प्रतिसाद दिला नाही. अखेर महात्मा गांधी रोडवरील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित करण्यात आला.
यामुळे नागरिक आणि पर्यटकांना रात्री काळोखातून मार्गक्रमण करावे लागत असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात, पाय मुरगळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिकांनी नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नगरपरिषदेकडून कराच्या स्वरूपात घरपट्टी व प्रवासी कर वसूल केला जातो. या निधीतून नागरिक व पर्यटकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असताना, कराचा पैसा इतर कामांवर खर्च केला जात असल्याचा आरोप होत आहे. मागील काही महिन्यांत जीईएम पोर्टलवरून लाखो रुपयांची खरेदी झाली, मात्र मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप नागरिक करीत आहेत.
नगरपरिषद अधिकाऱ्यांचे वास्तव शहराबाहेर असल्याने येथील समस्यांची त्यांना कल्पना नसते. मुख्याधिकारी केवळ दुपारी कार्यालयात उपस्थित राहतात, त्यामुळे अंधारात चालणाऱ्या नागरिकांची अडचण त्यांच्या लक्षातच येत नाही, अशी टीका स्थानिकांनी केली.“नगरपरिषद तात्काळ पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करून सेवा पुरवावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष संतोष कदम यांनी दिला.
दरम्यान, “माथेरानमधील ५१ कनेक्शनपैकी काही बंद आहेत, तर काही एमएमआरडीएच्या अखत्यारीतील आहेत. तरीही महावितरणकडे 10 लाख 29 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने बिलाची नोंद काल होऊ शकली नाही,” असे नगरपरिषदेचे लेखापाल भारत पाटील यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके