* एकाच दिवसात १.५ लाख मोफत चष्म्यांचे विक्रमी वितरण
* मुंबईकरांच्या जीवनात नवीन दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न - आमदार अमीत साटम
मुंबई, 28 सप्टेंबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या सेवा पंधरवडा’चा एक भाग म्हणून मुंबई भाजपने आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली नमो नेत्र संजीवनी अभियान उपक्रम राबविला आणि यात १.५ लाख मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मुंबई भाजपच्या या भव्य उपक्रमाची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस या मान्यवर संस्थांनी घेतली असून, त्यांनी या विक्रमाची अधिकृत नोंद केली आहे. एकाच दिवशी सर्वात जास्त मोफत चष्म्यांचे वाटप या श्रेणीत या विक्रमाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांना विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.
आमदार अमीत साटम यांनी सांगितले की या उपक्रमांतर्गत मुंबईतील सर्व २२७ महानगरपालिका वॉर्डांमध्ये एकाच वेळी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली आणि मोफत चष्मे वाटण्यात आले. एकाच दिवसात एकूण १.५ लाख मोफत चष्मे वाटण्यात आले, असे आमदार अमीत साटम म्हणाले.
सेवा पंधरवडा हा सेवा, जबाबदारी, सामूहिक प्रयत्न आणि भारतीय संस्कृतीचे मूल्य साजरे करण्यासाठी आयोजित केला आहे.
हे केवळ सेवेचे कार्य नाही तर एक कर्तव्य आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा सामाजिक उपक्रम समर्पण भावनेने हाती घेतला. भविष्यातही असेच लोककल्याणकारी कार्यक्रम आयोजित केले जातील, असे आमदार अमीत साटम म्हणाले.
आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले की सेवा आणि समर्पण भाजपच्या पाया असून हा उपक्रम त्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. या मोहिमेचा प्राथमिक उद्देश मुंबईकरांच्या जीवनात एक नवीन दृष्टिकोन आणणे आणि समर्पण भावनेने त्यांची सेवा करणे हा होता, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
हजारो डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. तपासणी करण्यासाठी आणि चष्म्यांचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी विविध ठिकाणी नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी