छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे पैठण तालुक्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक गावे पाण्यात असल्यामुळे नागरिकांचे स्थलांतर पैठणच्या नाथ हायस्कूल येथे करण्यात आले आहे.
नाथ हायस्कूल पैठण येथे आज पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी अतिवृष्टीमुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था, अन्नधान्य याबाबत प्रशासनाशी समन्वय साधून माहिती घेतली.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या असुविधा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात धीर न गमावता एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेतले जातील आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास आमदार भुमरे यांनी दिला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis