पाकिस्तानचे धोरणात्मक भविष्य अमेरिकेकडे नाही तर चीनकडे - ख्वाजा आसिफ
इस्लामाबाद , 28 सप्टेंबर (हिं.स.)।आमच्या देशाचे ‘धोरणात्मक भविष्य’ अमेरिका नव्हे, तर चीनसोबत जोडलेले दिसते, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. त्यांनी यामागचे मुख्य कारण चीनचा ‘विश्वासार्ह’ भागीदार असणे असे दिले आहे, जे
पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ


इस्लामाबाद , 28 सप्टेंबर (हिं.स.)।आमच्या देशाचे ‘धोरणात्मक भविष्य’ अमेरिका नव्हे, तर चीनसोबत जोडलेले दिसते, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. त्यांनी यामागचे मुख्य कारण चीनचा ‘विश्वासार्ह’ भागीदार असणे असे दिले आहे, जे अमेरिका बाबतीत लागू होत नाही. विशेष म्हणजे, ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आले आहे.

ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य ब्रिटिश-अमेरिकन पत्रकार मेहदी हसन यांना दिलेल्या एका मुलाखतीत केले. पत्रकाराने त्यांना विचारले होते की, गेल्या चार वर्षांत पाकिस्तानने ८० टक्के शस्त्रे चीनकडून घेतली आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेसोबतची मैत्री, चीनसोबतच्या संबंधांवर परिणाम करू शकते का? यावर उत्तर देताना आसिफ म्हणाले, “चीन हा अत्यंत विश्वासार्ह भागीदार आहे. त्यांनी आम्हाला पाणबुड्या आणि जेएफ-१७ सारखी लढाऊ विमाने दिली आहेत. चीनसोबत आमचे संरक्षण सहकार्य वाढत आहे, कारण अमेरिका व इतर काही देश ‘अविश्वासार्ह’ ठरले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध नेहमीच ‘देणे-घेणे’ स्वरूपाचे राहिले आहेत. मात्र, पाकिस्तानने चीनला कायमच एक प्रमुख सहकारी मानले आहे.”

पत्रकाराने जेव्हा पुन्हा विचारले की, “म्हणजेच तुमचं रणनैतिक भविष्य चीनसोबतच आहे का?” तेव्हा ख्वाजा आसिफ यांनी “हो” असे उत्तर देत जोडले, “चीन आमचा शेजारी देश आहे. आम्ही एकमेकांशी सीमारेषा आणि भूगोल शेअर करतो.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, पाकिस्तानचे अमेरिका सोबत असलेले संबंध चीनसाठी चिंतेचा विषय नाहीत.

या मुलाखतीत ख्वाजा आसिफ अनेक वेळा अस्वस्थ आणि अडखळलेले दिसले. जेव्हा त्यांना विचारले गेले की, “पाकिस्तानमध्ये खरी सत्ता राजकीय नेतृत्वाकडे आहे की लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हाती?” तेव्हा आसिफ हे उत्तर देताना हिचकिचले.जेव्हा विचारले गेले की, “लष्करप्रमुख तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत का?” तेव्हा त्यांनी सुरुवातीला ‘असं नाही आहे’ असं म्हटलं. मात्र पुन्हा विचारल्यावर त्यांनी एवढंच म्हणत विषय टाळला की, “तो एक राजकीय नियुक्ती आहे.” यावरून स्पष्ट होते की, ख्वाजा आसिफ यांनी कठोर आणि संवेदनशील प्रश्नांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ख्वाजा आसिफ यांच्या मुलाखतीच्या एक दिवस आधीच शरीफ आणि मुनीर यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि विदेश सचिव मार्को रुबिओही उपस्थित होते.पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत डोनाल्ड ट्रम्प यांची भरभरून स्तुती केली आणि त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्याची मागणीही केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande