पालघर : नवदेवी दर्शनार्थी बस पाण्यात अडकली; प्रवासी सुरक्षित
पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सफाळे पूर्वेकडील गेरूच्या ओहळ परिसरात रस्त्यावर शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी साचले. या पाण्यातून मार्गक्रमण करताना एक लक्झरी बस बंद पडल्याने मोठी खळबळ उडाली. बसमधील महिला प्रवाशांना अखेर ग्रामस
नवदेवी दर्शनाला आलेल्या महिलांची बस पाण्यात अडकली


पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सफाळे पूर्वेकडील गेरूच्या ओहळ परिसरात रस्त्यावर शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी साचले. या पाण्यातून मार्गक्रमण करताना एक लक्झरी बस बंद पडल्याने मोठी खळबळ उडाली. बसमधील महिला प्रवाशांना अखेर ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

शनिवारी रात्री सफाळे येथील सर्पमित्र गेरूच्या ओहळ परिसरात पाण्याची स्थिती पाहण्यासाठी गेले असता, त्यांना लक्झरी बस पाण्यात अडकलेली दिसली. त्यांनी तात्काळ ही माहिती उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश (बंटी) म्हात्रे यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसरपंच म्हात्रे स्वतःचा जेसीबी घेऊन घटनास्थळी धावून आले.

सदर लक्झरी बस ही कल्याण-डोंबिवलीतील मानपाडा येथून पालघर जिल्ह्यात नवदेवी दर्शनासाठी आलेली होती. मात्र गेरूच्या ओहळाजवळ रस्त्यावर साचलेले पाणी किती खोल आहे याचा अंदाज न आल्याने बस पाण्यातच थांबली. बसचा स्टार्टर बंद पडल्यामुळे स्थानिक मेकॅनिकला बोलावूनही ती सुरु होऊ शकली नाही. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्यात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरूच होता.

अखेर उपसरपंच बंटी म्हात्रे यांच्या जेसीबीच्या सहाय्याने बस जवळील नायरा पेट्रोल पंपावर सुरक्षित हलवण्यात आली. त्यानंतर बसमधील महिला प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामसेवालय, सफाळे येथील हॉलमध्ये मुक्कामाची व्यवस्था करून देण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ निलेश वझे यांनी सर्व महिलांना चहा व बिस्किटांची सोय करून दिली.

मुसळधार पावसात बस बंद पडल्याने रात्रभर महिलांना थांबावे लागल्यानंतर अखेर रविवारी पहाटे सहा वाजता त्यांना घेण्यासाठी मुंबईहून दुसरी बस आली. त्यानंतर सर्व महिलांनी दिलासा व्यक्त करत परतीचा प्रवास सुरू केला. या संपूर्ण प्रकरणात उपसरपंच बंटी म्हात्रे यांचे तात्काळ व धाडसी प्रयत्न, तसेच सर्पमित्र आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळेच महिलांना दिलासा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande