परभणी, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्डचा बेस्ट परफॉर्मिंग बँक पुरस्कार प्राप्त झाला असून, हा सन्मान मिळवणारी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मराठवाड्यातील एकमेव बँक आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर यांनी केले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर होते.
दरम्यान,सभेच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक, शहिदांना, लेखक, संशोधक, कवी, साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, जेष्ठ खेळाडू, सामाजिक व सहकारी क्षेत्रातील मान्यवर, तसेच बँकेचे आजी-माजी संचालक, सभासद, ठेवीदार व सेवक अशा दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अत्यंत साधेपणाने कार्यक्रम पार पाडण्यात आला. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने हार किंवा पुष्पगुच्छ स्वीकारणे टाळून फक्त शब्दसुमनांनी स्वागत करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर कुरुंदकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. बँकेस कर्जवसुलीत भरीव कार्य करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या चेअरमन यांचा अध्यक्ष मा. सुरेशराव वरपुडकर व उपाध्यक्ष मा. राजेश पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कारही करण्यात आला.
अध्यक्षीय समारोत मा. श्री. सुरेशराव वरपुडकर यांनी बँक राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यामध्ये संस्था मजबुतीकरण, पगारदार खातेदारांसाठी विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना यांचा समावेश होता. खातेदारांसाठी मिस कॉल सुविधेद्वारे शेवटचे पाच व्यवहार तपासण्याची सेवा उपलब्ध असून, लवकरच सोनेतारण योजना गृहकर्ज योजना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आधार ऑथेंटिकेशन व ई-केवायसी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगतले. बँकेला सतत चार वर्षांपासून अ वर्ग प्राप्त झालेला आहे या वर्षी सभासद संस्थाना लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी भाषणातून जाहीर केले.तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्डचा बेस्ट परफॉर्मिंग बँक पुरस्कार प्राप्त झाला असून, हा सन्मान मिळवणारी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मराठवाड्यातील एकमेव बँक असल्याचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis