- कडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी पूर्व उत्सव संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे सहकार्य संघाला लाभले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव कडा येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर तालुका संघचालक श्री दादासाहेब आश्रूबा शेकडे, प्रशासकीय अधिकारी (श्री अमोलक संस्था कडा) प्रा. नवनाथजी पडोळे, उपस्थित होते. उत्सवाच्या सुरुवातीला नगरातून संघाचे संघोष पथसंचलन झाले व उत्सवाचा समारोप श्रीराम पेठ या ठिकाणी झाला.
उत्सवातील प्रमुख वक्ते रोहित सर्वज्ञ म्हणाले, “जगभरात अनेक ठिकाणी अशांततेचे वातावरण आहे. सांस्कृतिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे जगातील अनेक देश ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत उत्तरोत्तर प्रगती करणारा आणि बलशाली होणारा भारत जगाचे आकर्षण बनत आहे. त्यासाठी अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, ‘स्व’चा बोध, भेदभाव विरहित समरसमय व्यवहार, नागरिक कर्तव्याचे पालन आणि कुटुंब प्रबोधन हे पंच परिवर्तन आपल्या व्यवहारात आपल्याला आणावे लागणार आहे. संघाचे शंभर वर्ष अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणातून साकार होत आहे. समाजाला सोबत घेत संघाने आपली वाटचाल केली व पुढेही ती कायम राहील असे प्रतिपादन त्यांनी केले. या उत्सवात नगरातील स्वयंसेवक तसेच समाजबांधव, नागरिक सज्जन मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis