रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी विविध पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’, २९ सप्टेंबर रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ तर ३० सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाचा अंदाज :२८ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात गडगडाटासह अतिजोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. २९ सप्टेंबर रोजी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आणि ३० सप्टेंबर रोजी मध्यम पावसाचा ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
प्रशासनाचे निर्देश: जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व विभागप्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार काम करण्याचे आदेश दिले आहेत. दरड कोसळणे, झाडे पडणे किंवा रस्ते वाहतूक बंद होण्याच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वूड कटर आणि जेसीबी यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ सतत सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
मच्छिमार आणि किनारी भागांसाठी सूचना:मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामानाचा अंदाज प्रत्येक किनारी गावापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. किनारी भागातील नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन साधने आणि ॲप्स, शोध व बचाव पथके, आपत्ती व्यवस्थापन साधने यांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून सर्व पथके तयार आहेत.
नागरिकांनी ‘दामिनी ॲप’ व ‘सचेत ॲप’ डाऊनलोड करून विजांचा इशारा व हवामान बदलाची माहिती वेळेवर मिळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आपत्कालीन संपर्क:कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष 8275152363 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांनी सर्व विभागांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके