शिवसैनिकांचा निर्धार : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भगवा फडकवणार
पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने तयारीचा धडाका सुरू केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी करून भगवा फडकवण्याचा संकल्प तालुकानिहाय बैठकींमधून क
शिवसैनिकांचा निर्धार : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भगवा फडकवणार


पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने तयारीचा धडाका सुरू केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी करून भगवा फडकवण्याचा संकल्प तालुकानिहाय बैठकींमधून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

याच अनुषंगाने पालघर विधानसभेतील गंजाड जिल्हा परिषद गटात मेळावा पार पडला. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात “कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचेच उमेदवार निवडून आणायचे” असा एकमुखी निर्धार करण्यात आला. स्थानिक प्रश्नांची मांडणी, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्रांमध्ये जनतेचा विश्वास शिवसेनेसोबत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले विकासकाम जनतेपर्यंत जोमाने पोहोचवायचे आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी संघटना ठामपणे सोबत उभी राहील.”

पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी प्रशासनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे आश्वासन दिले. सहसंपर्कप्रमुख केदार काळे यांनी इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांची पूर्ण तयारी करून ठेवण्याचे सांगितले, तर तालुकाप्रमुख संतोष देशमुख यांनी संघटना आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

गंजाड येथील सरपंच अभिजीत देसक यांनी “गावपाड्यात पक्षाने दिलेला कोणताही निर्णय मान्य करून उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे” अशी ग्वाही दिली.

जिल्हाभरात सुरू असलेल्या बैठकींमुळे निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच शिवसेनेने प्रचाराची जोरदार सुरुवात केली असून ग्रामीण भागात संघटनात्मक उत्साह उफाळून आल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande