सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडला, अशी एक म्हण प्रचलित होती. परंतु, मागील अनेक शतकानंतर अतिवृष्टी, महापुरांमुळे जनावरांचा चाराही वाहून गेला. यातून प्रश्न बिकट बनत चालला आहे. मुक्या जनावरांचीही परीक्षा निसर्ग का घेत आहे, असा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे.कोरडा दुष्काळ पडल्यानंतर चारा छावणी सुरू करून जनावरे वाचविली. शासनाने अन्य भागांतून दुष्काळग्रस्त भागात चारा आणून दिला गेला. परंतु, ओला दुष्काळात सीना नदीच्या महापुरांत उसासह कडब्याचे गंज, घरी ठेवलेले पशुखाद्य, हिरवा चारा, गवत जमिनीसह खरडून वाहून गेल्या आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही शासनाकडून चारा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या परिसरातील सुमारे 88 गावांना महापुराचा फटका बसला आहे. तर कुरनूर धरण, हरणा नदी, बोरी नदीसह अन्य ठिकाणी अतिवृष्टीने चार्यासह पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने आता चार्याचा प्रश्न भीषण बनत चालला आहे. सांगली आणि सांगोला येथील महूदमधून 100 मेट्रिक टन चारा घेऊन वाहने दाखल झाली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड