परभणीतील साळापुरी येथे जैन समाजाचा मदतीचा हात
परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। अवकाळी पावसामुळे आलेल्या पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी भारतीय जैन संघटना व सकल जैन समाज, परभणी यांच्या वतीने परभणी तालुक्यातील साळापुरी गावात मदतकार्य हाती घेण्यात आले. या अंतर्गत गावातील ३०
परभणीतील साळापुरी येथे जैन समाजाचा मदतीचा हात


परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

अवकाळी पावसामुळे आलेल्या पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी भारतीय जैन संघटना व सकल जैन समाज, परभणी यांच्या वतीने परभणी तालुक्यातील साळापुरी गावात मदतकार्य हाती घेण्यात आले. या अंतर्गत गावातील ३० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये कपडे, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट तसेच किराणा सामानाचा समावेश होता. जैन समाजातील सर्व समाजबांधवांनी या मदत कार्यासाठी कपडे, अन्नधान्य, ब्लँकेट तसेच आर्थिक दानराशी उपलब्ध करून दिली. त्यामुळे हे मदतकार्य अधिक व्यापक स्वरूपात पार पडले.

यावेळी प्रत्येक महिलेला साडीचे वाटप करण्यात आले, तर गर्भवती महिलांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यात आला. त्यांना जीवन जगण्याचे सामर्थ्य व प्रेरणा मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. तसेच इतर राज्यांतून स्थलांतरित झालेले ५ आदिवासी कुटुंब सुद्धा साळापुरीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनाही जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

या मदतकार्यावेळी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, सकल जैन समाजाचे पदाधिकारी, परभणीतील जैन समाजबांधव तसेच साळापुरी गावाचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, संकटाच्या काळात समाजातील परस्पर सहकार्याची परंपरा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande