हनोई, 28 सप्टेंबर (हिं.स.)।व्हिएतनाममध्ये ‘बुओलोई’ नामक चक्रीवादळाच्या भीतीने रविवारी(दि.२८) मध्य व उत्तरेकडील प्रांतांमधून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हे चक्रीवादळ अत्यंत वेगाने व्हिएतनामकडे येत आहे, आणि आज रविवारी संध्याकाळपर्यंत ते बंदरावर धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ १३३ किमी/तास (८३ मैल प्रति तास) वेगाने पुढे जात आहे. त्याच्या वाऱ्यांमुळे १ मीटर (३.२ फूट) पेक्षा जास्त उंचीच्या लाटा येऊ शकतात आणि मुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे अचानक पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता आहे.
व्हिएतनाममधील हवामान विभागाने सांगितले की, रविवारी पहाटे 4 वाजता, बुओलोई चक्रीवादळ मध्य व्हिएतनामच्या पूर्वेस सुमारे 200 किमी अंतरावर होते आणि ते उत्तरेकडून पश्चिमीकडे सरकत होते. संध्याकाळ साडे 6 च्या सुमारास हे चक्रीवादळ क्वांग त्री आणि ङे आन् प्रांतांमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी मध्य आणि उत्तरेकडील भागात मासेमारी बोटींना समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे.तसेच संवेदनशील भागांमधील लोकांना संध्याकाळ 5 वाजेपर्यंत हलवणे अनिवार्य केले आहे. राज्य माध्यमांच्या वृत्तानुसार, दा नांग शहराने २,१०,००० हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्याची योजना आखली होती, तर ह्यू शहराने ३२,००० हून अधिक किनारी रहिवाशांना स्थलांतरित करण्याची तयारी दर्शविली होती.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले की, दा नांग आंतरराष्ट्रीय विमानतळासह चार किनारी विमानतळांवर उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. अनेक उड्डाणांना पुर्ननियोजन करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून मध्य व्हिएतनाममध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ह्यू शहरातील नीच भागातील रस्त्यांवर पूर आला, वादळी वाऱ्यांमुळे तिथल्या काही घरांची छप्परे उडाली आणि पुराच्या पाण्यात वाहून गेलेला किमान एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
वादळातून वाचण्याच्या प्रयत्नात क्वांग ट्राय प्रांतात एक मासेमारी बोट बुडाली आणि दुसरी बोट पाण्यात अडकली. आतापर्यंत आठ जणांना वाचवण्यात आले आहे, तर इतर तिघांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हवामान तज्ज्ञांनी 1 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची सतर्कता जारी केली आहे, ज्यामुळे उत्तरी व मध्य प्रांतांमध्ये पूर व भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.
या आठवड्यात बुओलोई हा आशियात प्रवेश करणारा दुसरा मोठा चक्रीवादळ आहे. त्याआधी, चक्रीवादळ रागासा हे उत्तरी फिलिपीन्स आणि तैवानमध्ये वर्षांतील एक प्रचंड शक्तिशाली वादळ मानले गेले होते, ज्यामुळे किमान 28 लोकांचा मृत्यू लोकांचा मृत्यू झाला होता. नंतर ते वादळ चीनमध्ये पोहोचले आणि तिथे कमकुवत होऊन समाप्त झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode