तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सातव्या माळेच्या दिवशी, आज रविवारी देवीची ''शेषशाही अलंकार महापूजा'' मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि विधीवत परंपरेनुसार संपन्न झ
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सातव्या माळेच्या दिवशी, आज रविवारी देवीची 'शेषशाही अलंकार महापूजा' मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि विधीवत परंपरेनुसार संपन्न झाली. या सोहळ्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या दिवसाच्या अलंकार पूजेला विशेष धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर विश्राम करत असताना, देवी त्यांच्या नेत्रकमलात विराजमान होती. त्यावेळी भगवान विष्णूंच्या कानातील मलापासून शुंभ आणि निशुंभ या दैत्यांची उत्पत्ती झाली व त्यांनी विष्णूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करून तिला जागृत केले. देवीने तात्काळ प्रकट होऊन त्या दैत्यांचा संहार केला आणि भगवान विष्णूंचे रक्षण केले. या प्रसंगानंतर भगवान विष्णूंनी आपली शेषशय्या देवीला अर्पण केली. या श्रद्धेचे प्रतीक म्हणून दरवर्षी नवरात्रात देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडली जाते.

नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक विधी आणि पूजा-अर्चा पार पडत असून, भाविकांच्या गर्दीने संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, काल शनिवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री, श्री तुळजाभवानी देवीची गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीलाही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande