रत्नागिरी : हातखंबा कार अपघातात दोघे बचावले
रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथे आज (२८ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास ह्युंडाई ग्रँड आय टेन कारचा अपघात झाला आणि ती जळून खाक झाली. गाडीतून प्रवास करत असलेले वडील आणि मुलगी बचावले आहेत. मोटारीत पत्रकार प्रमोद कोन
अपघातग्रस्त मोटार


रत्नागिरी, 28 सप्टेंबर, (हिं. स.) : हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथे आज (२८ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास ह्युंडाई ग्रँड आय टेन कारचा अपघात झाला आणि ती जळून खाक झाली. गाडीतून प्रवास करत असलेले वडील आणि मुलगी बचावले आहेत. मोटारीत पत्रकार प्रमोद कोनकर यांचे जावई डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (४० वर्षे) आणि श्रीशा प्रभुदेसाई (दहा वर्षे) असे दोघेच प्रवास करत होते.

महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडलेले असल्याने अनेक अपघात होत आहेत. आजच्या अपघातातील मोटार देवगडवरून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. दुपारी पावणेदोनच्या सुमारास हातखंबा पोलीस चेकपोस्टनंतर थोड्या अंतरावर हा अपघात घडला. डायव्हर्जनचा फलक पुरेशा अंतरावर आधी लावलेला नसल्याने आणि डायव्हर्जनच्या ठिकाणी रस्त्यावर खडी असल्याने ब्रेक लावल्यानंतर गाडी दुभाजकावर उलटली. त्यातून सुदैवाने दोन्ही प्रवाशांना बाहेर पडता आले. त्यानंतर गाडीने पेट घेतला; स्थानिक नागरिक, तसेच रस्त्यावरील अन्य वाहनचालकांनीही तातडीने मदत केली. दोघेही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. अपघातानंतर जवळपास अर्ध्या-पाऊण तासानंतर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. बंबाने आग विझवली; मात्र गाडीचा निव्वळ सांगाडा राहिला आहे. गाडीने पेट घेतल्याने वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली होती. त्यामुळे दोन्ही दिशांनी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या; मात्र आग विझवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande